साईमत / जळगाव
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही दिवस उसंत घेतली असून आता वातावरण पुन्हा उष्णतेकडे वळू लागले आहे. मिळालेला गारव्याचा दिलासा कमी होत असून नागरिकांना पुन्हा उन्हाची तीव्रता आणि वाढता उकाडा जाणवू लागला आहे.
मागील काही दिवसांतील पावसामुळे तापमानात घट झाली होती, त्यामुळे उन्हापासून काहीसा आराम मिळाला होता. मात्र, हा आराम तात्पुरता ठरला असून आकाश स्वच्छ होताच तापमानात पुन्हा वाढ होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते १० एप्रिलदरम्यान वातावरण प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. या काळात दिवसाचे तापमान सुरुवातीला सुमारे ३६ अंश सेल्सिअस राहून हळूहळू वाढत ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्रीचे तापमान १९ ते २१ अंशांच्या दरम्यान राहील, त्यामुळे रात्रीच्या वेळी काही प्रमाणात गारवा जाणवेल.
तसेच १० एप्रिलनंतर उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर भारतात ७ एप्रिलपासून सक्रिय होणाऱ्या पश्चिमी विक्षोभचा या भागावर विशेष परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एकूणच, येणारा आठवडा हवामानाच्या दृष्टीने स्थिर आणि शांत राहण्याची शक्यता आहे.
