साईमत -जळगाव- प्रतिनिधी | भाविकांचे श्रद्धास्थान आणि सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध श्री मनूदेवी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून १ लाख ३५ हजार रुपये मूल्याचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या पळवून नेल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनेल गेटचे तसेच गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. गाभाऱ्यात शिरल्यानंतर चोरट्याने श्री मनूदेवी माता आणि श्री रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीच्या मुकुटांसह छत्र्यांवर हात साफ केला. या धाडसी चोरीप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
