आमदार चषक राज्य टेबल टेनिस स्पर्धेत रेगन, संपदा, कुशल, प्रिथा विजयी

0
9

ठाण्याच्या मधुरिका पाटकरला धक्कादायक पराभवाला जावे लागले सामोरे

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष, महिला व युथ मुले, मुली ह्या गटांचे अंतिम सामने खेळले गेले. त्यात पुरुष गटात मुंबई उपनगरच्या रेगन अलबुकर्क, महिला गटात मुंबई उपनगरची संपदा भिवंडकर, युथ मुले गटात नाशिकचा कुशल चोप्रा तर मुलींमध्ये पुण्याची प्रिथा वर्तिकर हे अंतिम विजेते ठरले.

महिला गटाच्या उपांत्य लढतीत अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याच्या मधुरिका पाटकरला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अतिशय चुरशीची लढत येथे बघायला मिळाली. पहिला गेम ठाण्याच्या काव्या भटने ११-९ असा घेऊन चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधुरिकाने पुढील दोन गेम१२-१०, ११-९ असे घेत आघाडी घेतली.त्यानंतर काव्याने ११-६, ११-६ असे दोन गेम जिंकत ३-२ अशी आघाडी घेतली. जिंकण्यासाठी आता तिला एका गेमची आवश्यकता असतांना अनुभवी मधुरिकाने पुढील गेम ११-८ ने घेत सामन्यांत बरोबरी साधली. मात्र निर्णायक शेवटचे गेम काव्या भटने ११-७ असा जिंकत महिला गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

सामना निर्णायक गेममध्ये गेला

अंतिम फेरीत मात्र काव्या भटला मुंबई उपनगरच्या संपदा भिवंडकरकडून पराभूत व्हावे लागले. हा सामना रंगतदार झाला. विजेत्या संपदाने सुरुवातीचे तिन्ही गेम ११-७, १२-१०, ११-८ असे जिंकत जोरदार आघाडी घेतली. मात्र काव्याने लागोपाठ तीन गेम घेत बरोबरी साधली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी तीन गेम घेतल्याने सामना निर्णायक गेममध्ये गेला. येथे मात्र संपदाने ११-६ असा गेम घेत विजेतेपद मिळविले.

पुरुष गटाची अंतिम लढत झाली अटीतटीची

पुरुष गटाची अंतिम लढत अटीतटीची झाली. हा सामना सात सेटपर्यंत चालला. उपविजेत्या मुंबई उपनगरच्या जश मोदीने प्रथम तीन गेम जिंकले. मात्र, विजेत्या मुंबई उपनगरच्या रेगन अलबुकर्कने पुढचे चारही गेम जिंकत विजेतेपद प्राप्त केले त्याने हा सामना ८-११, ७-११, ७-११, ११-५, ११-३, ११-६, ११-५ असा जिंकला.

युथ मुलांचा अंतिम सामना झाला एकतर्फी

युथ मुलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला. त्यात नाशिकच्या कुशल चोप्राने पुण्याच्या निल मुळेचा सरळ चार सेटमध्ये १२-१०, ११-६, १२-१०, ११-९ असा पराभव करून अजिंक्यपद मिळविले. युथ मुलींचा अंतिम सामनाही एकतर्फीच राहिला. यामध्ये पुण्याच्या प्रिथा वर्तिकरने पुण्याच्याच नायशा रेवस्करचा ११-५, ११-७, ११-५, ११-५ असा सहज पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. यानंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

यांची होती उपस्थिती

यावेळी टेबल टेनिस असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. चारुदत्त गोखले, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, क्रीडा संघटक माजी नगरसेवक नितीन बर्डे, समाजसेवक विशाल भोळे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कोषाध्यक्ष संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, गिरीष कुलकर्णी, राजु खेडकर, अरुण गावंडे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माजी राष्ट्रीय खेळाडू डॉ. श्रीधर त्रिपाठी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा राजेश जाधव, ॲड. विक्रम केसकर यांनी केले. बुधवारी, २ ऑक्टोबरपासून कॅडेट, मिडजेट, १५ आणि १७ वर्ष वयोगटातील सामन्यांना प्रारंभ होईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here