साईमत न्यूज नेटवर्क –
मालेगाव (नाशिक ग्रामीण) : नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवत चार आरोपींना अटक केली असून, तब्बल ७ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोसम पूल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. साद मोहम्मद इरफान (२४, रा. रजा चौक) आणि मोमीन मोहम्मद दानिश (१९, रा. रमजानपुरा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशीनंतर त्यांनी ती दुचाकी नवीन इस्लामपुरातून चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान ही दुचाकी आयेशानगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत या टोळीतील आणखी दोन साथीदारांचा शोध घेतला. हमजा इस्तियाक अहमद (२०) आणि सय्यद इजाज सय्यद यासीन (१९, दोघे रा. गुलाब पार्क, मालेगाव) यांना देखील अटक करण्यात आली.
चौकशीत या चौघांनी मिळून मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातून एकूण ७ महागड्या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहर व परिसरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने एकूण १८ चोरीच्या दुचाकी जप्त केल्याने चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
