‘विरोधकांचे तर राज्यात बारा वाजलेत!’; एकनाथ खडसेंना थेट ‘आराम’ करण्याचा खोचक सल्ला
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेला जळगाव आणि नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न अखेर मिटला आहे. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असून, दोन्ही जागांवर महायुतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, असा मोठा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, शिंदे स्वतः याबाबतची घोषणा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ना. महाजन यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत विविध राजकीय घडामोडींवर अत्यंत रोखठोक आणि खणखणीत भाष्य केले.
‘शरद पवार-राहुल गांधी एकत्र येतायत, माझ्या शुभेच्छा!’
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना गिरीश महाजन यांनी जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. राहुल गांधी आणि शरद पवार यांची टीम मिळून नक्कीच चांगले काम करेल. राज्यात किमान एक सक्षम विरोधी पक्ष शिल्लक राहिला पाहिजे, कारण सध्या तशी परिस्थिती नाही.” एकत्र येऊन किंवा वेगवेगळे लढूनही विरोधकांचे काहीच होत नाही, असे सांगत देशात आणि राज्यात विरोधी पक्षांचे ‘बारा वाजले’ असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून विरोधकांमध्ये जुंपणार!
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत महाजन म्हणाले की, विरोधकांमध्ये आतापासूनच अंतर्गत भांडणे सुरू झाली आहेत. जागावाटप आणि चेहऱ्यावरून हे लोक पुन्हा एकमेकांपासून वेगळे होतील, असा टोलाही त्यांनी लगावला. पुण्यात विरोधकांनी काढलेल्या मोर्चावर बोलताना त्यांनी पेपर फुटीचे सर्व आरोप फेटाळून लावले. केवळ मागणी करायची म्हणून काहीही आरोप केले जात असून, अशा निरर्थक मागण्यांनी किंवा राजीनाम्यांनी प्रश्न सुटत नसतात, असे सांगत त्यांनी विरोधकांची हवा काढून घेतली.
खडसेंवर थेट निशाणा!
जळगावमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बोलताना, शेतकऱ्यांना मोठी मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचे महाजन यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाजन यांनी बोचरा वार केला. “खडसे यांनी सध्या फक्त आराम करावा, त्यांची तब्येत खराब आहे. त्यांनी उगाच राजकीय उपद्रव मूल्य दाखवण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी,” असा अत्यंत खोचक सल्ला महाजन यांनी खडसेंना दिला.
सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीनंतर निर्माण झालेल्या वादावर आणि पक्षांतर्गत हस्तक्षेपाच्या विधानावर बोलताना, महायुतीकडून किंवा भाजपकडून त्यांच्या पक्षात कोणताही हस्तक्षेप केला जात नसल्याचे सांगत महाजन यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
