साईमत, रावेर : प्रतिनिधी
रावेर-रसलपूर दरम्यान जुगार खेळणाऱ्या पत्याच्या क्लबवर उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने छापा टाकत १३ जणांना जुगार खेळतांना अटक केली आहे. पोलिसांचा छापा पडल्यामुळे बहुतांश जुगाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. छाप्यात पाच लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे जुगार, सट्ट्यासह पत्ते खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
फैजपूरचे उपविभागीय अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांना रावेर ते रसलपूर रस्त्यावर एका घरात झन्ना मन्ना म्हणजे जुगार खेळण्याचा पत्ता क्लब सुरु असल्याची माहिती मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे आयपीएस श्रीमती सिंग यांनी स्वता:च्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस कर्मचारी अनिल इंगळे, सुमित बाविस्कर यांना छापा टाकण्यासाठी रावेरात पाठविले. यावेळी रावेर पोलीस स्थानकाचे काही कर्मचारी सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकण्यात आला. यावेळी काही जुगारी गोल राऊंड मांडून झन्ना मन्ना, मांग पत्ता खेळत असल्याचे दिसले. पोलिसांनी जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळावरुन १६ मोटरसायकल, आठ विविध कंपनीचे मोबाईल, १७ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.
पत्ता खेळणाऱ्यांमध्ये मुस्तफा नामदार तडवी (रमर्जीपूर, ता. रावेर), गणेश छगन पवार (अभोडा तांडा, ता.रावेर), जुबेर रफीक शेख (इमामवाडा, रावेर), फिरोज जुम्मा तडवी (जिन्सी आभोडा, रावेर), सलीम बाबु तडवी (अभोडा, ता. रावेर), आदिलखान सलीमखान (इमामवाडा, रावेर), समाधान सोमा महाजन (रसलपूर, ता. रावेर), किसन फरशी पवार (अभोडा, ता. रावेर), सतीष रामदास शिरतुरे (सिध्दार्थनगर, रावेर), अल्ताफ रशीद खान (भोईवाडा, रावेर), सुधाकर दयाराम महाजन (जुना सावदारोड, रावेर), रमजान सुपडू तडवी (रसलपूर, ता. रावेर), शुभम रामभाऊ महाजन अशा १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.
रावेर परिसरात अवैध धंदे बंद करण्याची मागणी
रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सट्टा आणि पत्त्याचे अवैध क्लब सुरू असतात. याकडेही पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रावेर शहरात क्लब तर कर्जोद, केऱ्हाळा, खानापूर, पाल, रसलपूर परिसरात सट्टा सुरु असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे शाळकरी मुले व्यसनाधीन होत आहे. या धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.