साईमत -जळगाव- प्रतिनिधी | राज्यात सध्या अर्थखात्याच्या वाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “राज्यात अर्थ खाते सांभाळता येण्यासारखा एकही सक्षम नेता नाही,” या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या बोचऱ्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते आमदार अनिल पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांनी मूळ शिवसेनेची ‘चिवसेना’ करून ठेवली, त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत,” अशा कडक शब्दांत पाटलांनी पलटवार केला असून राऊतांची टीका पूर्णपणे ‘अर्थहीन’ असल्याचे म्हटले आहे.
मागच्या इतिहासाचा विसर पडलाय का?
माध्यमांशी संवाद साधताना आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊत यांना मागच्या इतिहासाचा विसर पडलेला दिसतोय. महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावर असताना, ते या पदासाठी किती सक्षम आहेत, याबद्दल माध्यमांमध्ये कशी आणि किती चर्चा रंगत होती, याची आठवण आधी राऊतांनी करून घ्यावी.
मंत्रिमंडळ अधिकार मुख्यमंत्र्यांचेच!
पुढे बोलताना अनिल पाटील यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ खाते किंवा इतर कोणतेही खाते कोणाला द्यावे, हा पूर्णपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विशेषाधिकारावर आणि त्यांच्या निर्णयक्षमतेवर बोलण्याचा संजय राऊत यांना कोणताही कायदेशीर किंवा राजकीय अधिकार नाही.
’आधी स्वतःचा उरलेला पक्ष सांभाळा’
संजय राऊत हे सरकारला विनाकारण आणि फुकटचे सल्ले देत सुटले आहेत, असा टोला लगावतानाच, त्यांनी सरकारवर तोंडसुख घेण्यापेक्षा स्वतःचा उरलेला पक्ष कसा सांभाळायचा, याकडे आधी लक्ष द्यावे, असा खोचक सल्लाही आमदार अनिल पाटील यांनी शेवटी दिला.
