आसोदा रेल्वे पुलाच्या दुरुस्तीमुळे जळगावातील रस्ते वाहतुकीवर कायम; १२ ऑगस्टपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करा
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाळधी-तरसोद बायपासवरील आसोदा रेल्वे पुलाच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे करण्यात आलेले वळण (डायव्हर्शन) आणखी काही दिवस कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दिलेल्या माहितीनुसार, धुळेकडून नागपूरच्या दिशेने जाणारा एकेरी मार्ग १२ ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १२ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीतील बदल कायम ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळधी-तरसोद बायपासवरील आसोदा रेल्वे पुलावरील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या होत्या. तसेच भरावाच्या सिमेंट प्लेट खचल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून शहरातील महामार्गावरून वळविण्यात आली होती. मात्र, अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
एनएचएआयकडून पुलाच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, धुळेकडून नागपूरकडे जाणारा एकेरी मार्ग १२ ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सध्याचे पर्यायी मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी टाळणे, अपघातांची शक्यता कमी करणे आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
असे राहतील पर्यायी मार्ग
भुसावळ व नागपूरकडून धुळे किंवा मुंबईकडे जाणारी वाहने :
भुसावळ – तरसोद फाटा – कालिका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिवकॉलनी – बांभोरी पूल – पाळधी – धुळे.
मुंबई व धुळेकडून भुसावळ किंवा नागपूरकडे जाणारी वाहने :
पाळधी – बांभोरी – शिवकॉलनी – आकाशवाणी चौक – अजिंठा चौफुली – कालिका माता मंदिर – तरसोद फाटा – भुसावळ.
छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जाणारी वाहने :
छत्रपती संभाजीनगर – पहूर – जामनेर – नाहाटा चौफुली – भुसावळ – नागपूर.
नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने :
नागपूर – भुसावळ – नाहाटा चौफुली – जामनेर – पहूर – छत्रपती संभाजीनगर.
इंदूर, बडोदा व नंदुरबारकडून भुसावळ किंवा नागपूरकडे जाणारी वाहने :
चोपडा – अडावद – यावल – भुसावळ – नागपूर.
नागपूर किंवा भुसावळकडून नंदुरबार, बडोदा किंवा इंदूरकडे जाणारी वाहने :
भुसावळ – यावल – अडावद – चोपडा.
वाहतूक नियंत्रणासाठी संबंधित मार्गांवर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी संयम ठेवून पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
