साईमत न्यूज नेटवर्क –
मोहाली : पंजाबमधील मोहाली येथे प्रेमसंबंध तुटल्यानंतर सूडाच्या भावनेतून घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीची तिच्याच माजी प्रियकराने कार्यालयात घुसून चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेने अधिकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिंपल (रा. पतियाळा) ही तरुणी मोहालीतील एका नामांकित पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीत कार्यरत होती. घटनेच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना तिचा माजी प्रियकर व कंपनीतील माजी सहकारी हरविंदर सिंग ऊर्फ हॅरी कार्यालयात आला. काही कळण्याच्या आत त्याने डिंपलवर चाकूने हल्ला चढवला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या डिंपलने स्वतःचा बचाव करण्यासाठी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. मात्र, आरोपीने तिचा पाठलाग करून तिला गाठले आणि पुन्हा तिच्यावर वार केले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी कोणाचेही न ऐकता हल्ला करत राहिला.
गंभीर जखमी अवस्थेत डिंपल रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचे दृश्य कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डिंपलचा मृत्यू झाला, तर आरोपी हरविंदर सिंग याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक तपासात डिंपल आणि हॅरी हे गेल्या तीन वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत असल्याचे समोर आले आहे. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने डिंपलने हे नाते संपुष्टात आणले होते.
ब्रेकअपनंतर आरोपी मानसिक तणावाखाली असल्याचे तपासात समोर आले आहे. डिंपलशी पुन्हा संपर्क साधण्याचे त्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्याने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
