साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
विमुक्त जाती-अ प्रवर्गातील मागील अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोरी केलेली असल्यामुळे विमुक्त जाती-अ प्रवर्गात असलेल्या मूळ लाभार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. शैक्षणिक तसेच नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. साधारणतः दरवर्षी नोकर भरतीत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया पाच हजारापेक्षा जास्त बोगस लोकांनी, अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळवून मोठ्या प्रमाणात विमुक्त जाती-अ प्रवर्गात घुसखोरी केलेली आहे. त्यामुळे मूळ जातीतील लाभार्थी विद्यार्थी व बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. यासाठी मंगळवारी, ६ फेब्रुवारी २०२४ रोजी पहूर येथे गोरसेना व विमुक्त जाती-अ प्रवर्गातील सकल संघटनेच्यावतीने हजारोच्या संख्येने जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये विमुक्त जाती-अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसटीआय) लागू करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीत विजा-अ प्रवर्गातील एका तज्ज्ञ व्यक्तीची शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात यावी, २४ नोव्हेंबर २०१७ चा महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत भामटा व विमुक्त जाती-अ प्रवर्गातील सर्व जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात. त्या जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी, राज्य मागास अहवाल क्रमांक ४९ /२०१४ लागू करण्यात यावा, राज्य शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
मागण्या मान्य करून घेण्यासाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात हजारोच्या संख्येने मंगळवारी, ६ फेब्रुवारी २०२४ रोजी पहूर येथे जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार आणि सरकार जर समस्या सोडत नसतील तर येत्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये आमदारांना आणि सरकारला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनांमध्ये विमुक्त जाती-अ प्रवर्गातील हजारो बांधव, गोर सेना पदाधिकारी तसेच संजय शिंदे वडार संघटना, आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा टायगर, सुभाष जाधव मा.रा.स.चे अध्यक्ष जळगाव, अंजू पवार सामाजिक कार्यकर्त्या, अर्जुन जाधव, ब्रिजेश राठोड, योगेश राठोड, रतिलाल चव्हाण, रवी राठोड, प्रवीण चव्हाण, अनिल चव्हाण, सुरत चव्हाण, नंदू चव्हाण, योगेश चव्हाण यांच्यासह हजारोंच्या संख्येने गोरसेना समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी पहूर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.