साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनाला जळगावातून जोरदार पाठिंबा मिळाला आहे. आज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जागरूक नागरिकांच्या वतीने सकाळी १२ ते दुपारी १ या वेळेत शांततापूर्ण मात्र अत्यंत प्रभावी निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनांमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हाताळण्यात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
‘विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
निदर्शनादरम्यान उपस्थित आंदोलकांनी शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली.
“विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “शिक्षण व्यवस्था सुधारा”, आणि “लोकशाहीचा सन्मान करा” अशा जोरदार घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दुमदुमून गेला होता.
उपस्थितांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पर्यावरण संवर्धन हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने देशातील तरुणांच्या अपेक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणींवर सकारात्मक संवाद साधून निर्णय घेणे गरजेचे आहे.
निदर्शनांनंतर सर्वपक्षीय व विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी मंडळाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जळगावकरांचा नैतिक पाठिंबा जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पक्षीय भेद विसरून जळगावकरांनी दाखवलेली ही एकजूट लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि सामाजिक जागरूकतेचे प्रतीक ठरली. संपूर्ण आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडले.
या प्रसंगी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, गजानन मालपुरे, ॲड. जमील देशपांडे, प्रमोद पाटील, सौ. मंगला पाटील, जमील शेख, अशोक लाड वंजारी, एजाज मलिक, विराज कावडीया, विनोद शिंदे, निवृत्त प्राचार्य एस. एस. राणे, निवृत्त प्राचार्य राजकिशोर गुप्ता, शिवराम पाटील, किरण तळले, मुकुंदा रोटे, रिजवान जहागीरदार, ज्ञानेश्वर पाटील, संजू जमादार, सुनील माळी, ललित शर्मा, मुजीब पटेल, राजेंद्र निकम, चेतन पवार, अनंत परिहार, विष्णू धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
