प्रा. व. पु. होले यांचे कार्य, दातृत्व समाजाला प्रेरणा देणारे

0
1

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, नाट्य कलावंत, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. व. पु. होले हे ग्रेट टिचर आहेत. त्यांचे विविध क्षेत्रातील समाजोपयोगी कार्य, दातृत्च भाव सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कुलगुरू व्ही.एल. माहेश्‍वरी यांनी केले. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ गुरुवारी, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर कुलगुरू माहेश्‍वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे नामकरण आता ‘व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय’ असे झाले. नामकरण फलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी ईश स्तवन, स्वागत गीत सारिका गिरासे, पल्लवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून एन.सी. टी. ई. वेस्टर्न रिजनल कमिटी (नवी दिल्ली) चे सदस्य व यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार आर.पाटील होते. तसेच आंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता साहेबराव भुकन, के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सचिव ॲड. प्रमोद एन.पाटील, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, डॉ.हर्षवर्धन जावळे, रुपेश चिरमाडे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिल राव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.निलेश जोशी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. व. पु. होले आणि रजनी होले यांचा सत्कार करण्यात आला. व.पु. होले यांच्या ‘इच्यार करिसन रे भो !’ या ललित लेखांच्या दुसऱ्या आवृत्तीच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. पुस्तकासंदर्भातील माहिती प्रा.गोपीचंद धनगर यांनी दिली. यावेळी होले दाम्पत्याचा पुण्यातील भातृ मंडळ संस्थेतर्फे मान्यवर व श्रीधर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.राणे यांनी महाविद्यालयाच्या नामकरण बाबतची माहिती दिली. बदलत्या काळानुसार नवनवीन आव्हाने स्वीकारत महाविद्यालयाने कसे विविध शैक्षणिक बदल अंमलात आणून विद्यार्थी हिताचे कार्य कसे केले? महाविद्यालयाने आदर्श शिक्षक, नामांकित खेळाडू कसे घडविले, याबाबत त्यांनी सांगितले.

दात्यांचे योगदान महत्वाचे

समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकांनी ज्यांच्या त्यांच्यावतीने मोठे कार्य केले आहे. त्यांचे योगदान समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी खूप मोलाचे असते. प्रा. व. पु. होले अत्यंत संवेदनशील मनाचे, खऱ्या अर्थाने नितीमूल्य जोपासणारे, प्रेरणादायी शिक्षक आहेत. सर्वोत्तम खेळाडू, तसेच होले यांच्यासारखे आदर्श शिक्षक महाविद्यालयात घडून त्यांचा आणि संस्थेचा नावलौकिक देश, विदेश पातळीवर वाढत रहावा, अशी अपेक्षा नंदकुमार बेंडाळे यांनी व्यक्त केली.

संस्था आंतरराष्ट्रीय कीर्तीची

संस्थेतील पदाधिकारी भविष्याचा विचार करून संस्थेचा विकास साधत आहे. त्यांच्या समर्पणमधून ही संस्था आंतरराष्ट्रीय कीर्तीची आहे. या महाविद्यालय, संस्थेचे एका विद्यापीठात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा प्राचार्य सुहासकुमार पाटील यांनी व्यक्त केली. आपले नाव एका महाविद्यालयाला देण्यात येत आहे, हा जीवनातील सर्वात मोठा क्षण, सर्वेाच्च आनंद आहे. समाजाला सतत काही तरी देता यावे, यासाठी सदैव प्रयत्नशील राहता यावे, अशी अपेक्षा सत्कारमूर्ती होले यांनी व्यक्त केली. आभार प्रा. डॉ.निलेश जोशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here