मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ज्ञ व पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत. संमेलनात खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडणार असल्याचा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

येत्या ३ फेबु्रवारी रोजी दुपारी २.३० ते ४.३० वा. सभामंडप ३ – बालकवी-त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला/लोकसंगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचे संयोजन बापू हटकर व रमेश धनगर करणार आहेत. कार्यक्रमात खान्देशी वीरनृत्य, बंजारा नृत्य, धनगरी नृत्य, आदिवासींची पावरी नृत्य, नंदीबैल नृत्य, डोगऱ्यादेव वळीत नृत्यांबरोबरच खान्देशी वन्हे, तमाशा बतावणी, टिंगरी वाला, गोंधळ, भारूड, शाहिरी, संबळ, पावरी, खान्देशातील लोकगीते ज्यात आखाजी, कानबाई, गौराई, लग्नाची गाणी आदी लोकगीते सादर होणार आहेत. त्यात ‘कर्ण जन्मानी कहानी’ हे भावस्पर्शी अहिराणी काव्यमय सादरीकरण हे खास आकर्षण राहणार आहे. सर्व लोककला प्रकारातून जवळपास दीडशे लोककलाकारांना संधी मिळणार आहे, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, आयोजन समितीचे रमेश पवार, संयोजक बापूसाहेब हटकर, रमेश धनगर, वसुंधरा लांडगे यांनी सांगितले.

खान्देशी बोलीभाषांवर ३ फेब्रुवारीला परिसंवाद

याच दिवशी सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० वाजता खान्देशी बोलीभाषांवर परिसंवाद आयोजित केला आहे. त्यात अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर या बोलीभाषांचा समावेश केला आहे. डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी), अशोक कोळी (तावडी), डॉ. पुष्पा गावित (भिल्ली), डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली), डॉ. सविता पटेल (गुर्जर) सहभागी होतील. रात्री ८ ते १० वा. सभामंडप क्र.१ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित ‘अरे संसार संसार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात परिवर्तन गु्रपतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील व सहकलाकार सहभागी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here