सुट्टी असतानाही नगराध्यक्षा पालिकेत; बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्वीकारली
साईमत /सावदा, ता. रावेर / प्रतिनिधी :
आदिवासी दिनाचे औचित्य साधून सावदा नगरपालिकेत प्रथमच आदिवासी बांधवांच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट देण्यात आली. ही प्रतिमा नगरपालिकेच्या कार्यालयासाठी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले.
रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही आदिवासी बांधवांच्या भावनांचा विचार करून नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवत नगरपालिकेत येऊन बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्वीकारली. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून नगराध्यक्षांच्या या संवेदनशील भूमिकेचे कौतुक करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी आदिवासी दिनानिमित्त उपस्थित आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. जननायक बिरसा मुंडा यांचे सामाजिक योगदान, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
नगरसेविका रेखा वानखेडे, नगरसेविका सिमरन वानखेडे, विशाल सोनवणे, सुनील जंगले यांच्यासह अन्य उपस्थितांची यावेळी उपस्थिती होती. नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अशरफ तडवी, नवाब तडवी यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिका कार्यालयात बिरसा मुंडा यांची प्रतिमा देण्याचा उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याने आदिवासी समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. समाजाच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित असलेल्या या उपक्रमामुळे नगरपालिका प्रशासन आणि आदिवासी समाज यांच्यातील स्नेहभाव अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सुट्टीच्या दिवशीही आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर करून प्रतिमा स्वीकारण्यासाठी नगरपालिकेत उपस्थित राहिल्याबद्दल नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी नगराध्यक्षा रेणुका पाटील यांचे आभार मानले. आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमाची सावदा शहरात चर्चा असून, बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि कार्याचा समाजाला परिचय करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
