जळगाव पोलिसांनी १२५ अट्टल आरोपींना घेतले ताब्यात
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
शहरात अलीकडील काळात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी कारवाई केली. मंगळवारी (दि. १६) पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये अवघ्या तीन तासांत १२५ अट्टल आणि सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. या धडक मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रभावी वचक निर्माण करणे या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली होती. पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी पोलिसांची पथके सक्रिय झाली. शहर पोलीस ठाणे, शनिपेठ, एमआयडीसी, रामानंद नगर, जळगाव तालुका आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील परिसरांना पोलिसांनी वेढा घालत अचानक छापेमारी सुरू केली.
या कारवाईदरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्ह्यांमधील फरार आणि वॉन्टेड आरोपी तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या गुंडांची विशेष तपासणी करण्यात आली. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून संशयितांची पडताळणी केली आणि कायदेशीर कारवाई करत १२५ जणांना ताब्यात घेतले.
अवघ्या तीन तासांत पार पडलेल्या या व्यापक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, जळगाव पोलिसांकडून भविष्यातही अशाच प्रकारची विशेष तपासणी मोहीम आणि कोंबिंग ऑपरेशन्स राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
