साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगेसारख्या एका छोट्याशा गावातून क्रांतीकारक अविष्कार एका कष्टकरी शेतकरी पुत्राने घडविला आहे. प्रकाश सुनील पवार यांचे दोन नवीन संशोधन पेटेंट भारत सरकारच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. २० वर्षांसाठी एक अधिकारही प्राप्त झाला आहे. संशोधन क्रमांक १वॉटर कप टू टॅकल ड्रॉट सिचुएशन (पेटेंट अँप्लिकेशन नंबर २०२३२१०५२७७५ ) हे संशोधन शेतीसाठी वरदान ठरणार आहे. प्रकाश पवार यांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना ‘आशेचा किरण’ मिळणार आहे.
संशोधनात पिक लागवडीसाठी तसेच लागवडीपासून साधारण २ महिने जरी पिकाला पाणी मिळाले नाही तरी पिक तग धरू शकते, असा अविष्कारी फार्मुला अंमलात आणला आहे. निसर्ग, वरुणराजाच्या लहरीपणावर सहज फायदा या संशोधनामुळे शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे करोडो शेतकऱ्याना मदत होणार आहे. आता पावसाची वाट न बघता लागवड करणे शक्य होईल. तंत्रज्ञान हे पूर्णपणे जैविक आहे. शेतकरी वर्गासाठी खूप स्वस्तही असणार आहे. संशोधनाच्या पूर्ण चाचण्या ४० ते ४५ डिग्री सेल्सीअसमध्ये घेतल्या आहेत. सर्व यशस्वी झाल्या आहेत. या शोधामुळे वेळेवर पाऊस न आल्यामुळे होणारे नुकसान पूर्ण पणे टाळता येईल. शेतकरी आत्महत्या थांबविता येतील. तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या योजनेला खूप फायदा होणार आहे. आता अल्पप्रमाणात पाण्याचा वापर करून शेती करणे शक्य होईल, असे संशोधक प्रकाश पवार यांचे मत आहे.
संशोधन क्र २. कलर चेंगिंग कव्हर टू प्रॉटेक्ट प्रायव्हसी पेटेंट ॲप्लिकेशन नंबर (२०२३२१०५१९२०) हे संशोधन भारतीय संस्कृती तसेच भारतीय व्यक्तीमत्त्वांचे संरक्षण करणारे आहे. लोक पत्रिका बॅनर पिशव्या यांच्यावर देवाचे तसेच मोठमोठ्या व्यतिमत्वाचे (छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील देव- देवतांचे फोटो) छापतात आणि वापर झाल्यानंतर कचऱ्यात फेकून देतात. यामुळे मोठा अपमान होतो हे टाळण्यासाठी संशोधनामुळे क्रांतीकारक उपाय शोधला आहे.
दोन्ही संशोधन देशाच्या संशोधन क्षेत्रात क्रांतीकारक ठरणार
संशोधनात कव्हर हे ऑटोमॅटिकॅली वापरानंतर रंग बदलते. पत्रिका किंवा बॅनर अदृश्य करते. त्यामुळे होणारा आपल्या हातून नजर चुकीने किंवा अप्रत्यक्षरित्या होणारी विटंबना, अवमान या अविष्कारी संशोधनामुळे टाळता येणे शक्य होणार आहे. हे दोन्ही संशोधन देशाच्या संशोधन क्षेत्रात क्रांतीकारक ठरणारे असेच आहेत. शेतकरी पुत्र प्रकाश सुनील पवार हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई गावातच आशा सेविका म्हणून सेवा देत आहेत. आई-वडिलांच्या कष्ठाची जाणीव ठेवत घरीच मिळेल त्या साधन सामुग्रीतून मित्रांच्या मदतीने क्रांतीकारक संशोधनांचा शोध लावणे खूप मोठी गोष्ट आहे. शोधामुळे त्याला कॅनडा आणि इंग्लंडमधून नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. परंतु देशातील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्याने उच्च पगाराची नोकरी नाकारली. त्यांचे संशोधन गावासाठी अभिमानाचे व संपूर्ण देशासाठी क्रांतीकारक ठरणारे असेच आहे. प्रकाश पवार यांच्या संशोधनामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.