साईमत जळगाव प्रतिनिधी
१५ सप्टेंबर हा दिवस भारताचे सुप्रसिद्ध अभियंते सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्म दिवस आहे. विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची दाखल घेत केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस देशभरात ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालय येथे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळा अंतर्गत इयत्ता 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते ख्यातनाम अभियंते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
स्पर्धेत एकूण २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण संतोष जोशी यांनी केले. यातून अनुक्रमे प्रथम सोनाक्षी अमोल इंगळे, द्वितीय पियुषा योगेश पाटील, तृतीय जिग्नेशा रविंद्र लोखंडे या विद्यार्थ्यांना विजयी घोषित करण्यात आले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार कार्यक्रम प्रमुख कविता कुरकुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे शुभहस्ते विजयी स्पर्धकांना प्रशिस्तीपत्र आणि वैचारिक भेट देवून गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील कविता कुरकुरे, प्रीतेश गाडीलोहार, मंदार कुलकर्णी यांच्यासोबत विद्यालयातील शिक्षक व शालेय परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले.