साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज (१८ ऑगस्ट) दुसरा दिवस असून सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून धारेवर धरले जात आहे. विधानसभेच्या कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातील विधेयकावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले. समोर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून “काळी दाढी आणि पांढरी दाढी” याचा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिस्कील टिप्पणी केली.
छगन भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतला. “आत्तापर्यंत अन्नधान्यसहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे. कर वाढवल्यानंतर त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो.” असे छगन भुजबळ म्हणाले.
मुद्दा मांडण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे मला खूप आनंद झाला. पण माझा आनंद वेगळ्याच गोष्टीसाठी आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलेच दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही पांढरी दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. देशात पांढरी दाढी आणि राज्यात काळ्या दाढीचा प्रभाव आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. पण पांढऱ्या दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे.” असे भुजबळ यांनी म्हटल्यानंतर अनेकांना हसू आले.
छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा लक्ष केंद्रित केले. “तिकडे मंजूर झालेले तुम्ही इथे मंजूर करून घेता. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईची भावना तुम्ही तिकडे सांगा. सर्व वस्तूंवर भाववाढ सुरू आहे. शाळेतील पेन्सिल, खोडरबरवर तसेच रुग्णालयाच्या पाच हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. उपमुख्यमंत्र्यांचा दरारा दिल्लीमध्ये वाढल्याने मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातील महाराष्ट्राचे म्हणणे दिल्लीत सांगितले पाहिजे.” असे भुजबळ यावेळी म्हणाले.