साईमत न्यूज नेटवर्क –
पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पोलिस व्हॅनच्या चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी पोलिस व्हॅन अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात घडला. प्राथमिक अंदाजानुसार व्हॅनचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन अनियंत्रित झाले. त्यानंतर व्हॅनने समोरून येणाऱ्या दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे तिहेरी अपघाताची स्थिती निर्माण झाली.
अपघात इतका भीषण होता की पोलिस व्हॅन रस्त्याच्या कडेला जाऊन झाडीजवळ आदळली. या धडकेत व्हॅनचा चालक गंभीर जखमी झाला असून दुचाकी आणि कारमधील दोन जणांनाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर आरोपींना तातडीने दुसऱ्या वाहनातून न्यायालयात रवाना करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे. तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
