चाळीसगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
३२ जणांवर कारवाई, २९ हजार रोकडसह साहित्य हस्तगत
चाळीसगाव –
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. यातच शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ३२ जणांना अटक करण्यात आली असून २९ हजार रोकडसह जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांतर्फे मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीव्दारे याठिकाणी पोलीस पथकासह छापा टाकण्यात आला. या कारवाईत शिवाजी घाट व स्टेशन रोड परिसरात जुगार खेळणारे 32 इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 29 हजार 775 रुपये रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव पोलीस अधिक्षक कविता नेरकर (पवार), तसेच चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली व चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउनि योगेश माळी, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोहेकॉ प्रविण जाधव, पोहेकॉ अजय पाटील, पोहेकॉ विनोद पाटील, पो.कॉ. रविंद्र बच्छे, पो.कॉ. अमोल भोसले यांनी केली.पुढील तपास पोलीस करीत आहेत.