देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले. स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरात सोमवारी (दि. १०) करण्यात आलेल्या या कारवाईत संशयिताकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. प्रकाश तोलार (रा. खेडी, ता. जळगाव, हल्ली रा. साई सिटी, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध शस्त्रांबाबत माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, सोमवारी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तिची पडताळणी केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने संबंधित ठिकाणी रवाना झाले.
पोलिसांनी परिसरात सापळा रचून प्रकाश तोलार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शहरात अवैध शस्त्रांची तस्करी, विक्री किंवा बाळगण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेले पिस्तूल आणि काडतुसे संशयिताकडे नेमकी कशी आली, त्याने ती कोणाकडून मिळविली तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हवालदार विजय खैरे, पोलीस हवालदार योगेश जाधव, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पोलीस नाईक पराग दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
