साईमत / नागपुर
नागपुरातील अंबाझरी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात कौटुंबिक वाद आणि कथित मानसिक त्रासाचा मुद्दा पुढे आला आहे. पोलिसांनी मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि तिच्या परिचित व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शीलरत्न भीमराव बेलेकर असून ते प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) आणि महेश मेश्राम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महेश मेश्राम हा शिक्षक असून, गेल्या काही काळापासून त्यांचे रुचिकासोबत संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात कौटुंबिक मतभेद वाढले होते. घटस्फोट आणि संपत्तीच्या मागण्यांमुळे वाद तीव्र झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शीलरत्न यांना मानसिक त्रास होत असल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात शीलरत्न हे त्यांच्या भावाकडे गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शोधमोहीमेदरम्यान २४ फेब्रुवारी रोजी अंबाझरी तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला.
सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पुढील तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. संबंधित व्यक्तींकडून झालेल्या कथित छळाच्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
