मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नवमतदार विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा

0
14

साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती निर्माण करणे आवश्‍यक आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदानाचा समान हक्क प्रदान केला आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपला वाटा उचलायला हवा. त्याप्रमाणेच मतदानाबाबत लोकांच्या मनात कर्तव्य भावना निर्माण व्हावी, या हेतूने महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी उपस्थित ३०० विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदार शपथ देऊन देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून निर्भयपणे मतदान करण्याचे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.

‘देशहिताचे ठेवून भान, चला करू मतदान’, ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘आपले मत आपले भविष्य’, ‘करा आपल्या मताचे दान हीच आहे लोकशाहीची शान’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यासोबत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. लोकशाहीत मतदानाला असलेले महत्त्व सर्वांना समजावे आणि प्रत्येकाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे मत उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी यांनी व्यक्त केले. शिवाय महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी आपले मित्र, मैत्रिणी शेजारी व आपले आई-वडिलांसह इतर नातेवाईक अशा किमान दहा मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करून मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचा संकल्प घेतला आहे.

यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डीन डॉ.पी.एम महाजन तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ ए.एम.पाटील, डॉ डी.ए.वारके, प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा.एल.डी.चौधरी, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा. मोहिनी चौधरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here