पिंपळे बु. आश्रमशाळेत परसबागेत पिकविला जातोय सेंद्रिय भाजीपाला

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा पिंपळे बु. येथे दरवर्षी परसबाग तयार केली जात आहे. त्यातून सेंद्रिय भाजीपाल्याद्वारे उत्पन्न घेतले जाते. शाळेत निघणारे उष्टे अन्न कुजवुन त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खतांचा वापर करून परसबाग फुलविली जात आहे.

सद्यस्थितीला परसबागेत वांगे, मिरची, भोपळा, शेवगा, कोथंबीर, पालक, अशा प्रकारचा भाजीपाला घेऊन विद्यार्थ्यांना सकस व सेंद्रिय अन्न पुरविण्याचा प्रयत्न आश्रमशाळेत विद्यार्थी व शिक्षकांमार्फत केला जातो. बदलत्या जीवनशैलीत जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिवापर भाजीपाला उत्पादनासाठी केला जातो. त्याचे होणारे दुष्परिणाम आपण सर्व जण पाहत आहोत. खतांच्या अतिवापर केल्याने बालकांच्या आरोग्यावर आणि शारीरिक विकासावर होणारे अनिष्ट परिणामांची विद्यार्थी वयातच जाणीव होणे गरजेचे असल्याने हा उपक्रम आश्रमशाळेत राबविला जातो.

बियाण्यांसह साहित्य खरेदीसाठी पैशांचा वापर

आश्रमशाळेतील वर्गनिहाय विद्यार्थ्यांना परसबागेसाठी एक-एक छोटा प्लॉट दिला जातो. त्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर निश्‍चित केली जाते. वर्गशिक्षक व विद्यार्थी दोन्ही मिळून छोट्याशा प्लॉटमध्ये भाजीपाला पिकविण्याचे काम लागवडीपासून भाजीपाला निघेपर्यंत अतिशय प्रामाणिक व उत्साहाने करीत असतात. तसेच जास्तीचा निघणारा भाजीपाला विद्यार्थी शिक्षकांना विक्री करतात. त्यातून पुन्हा बियाणे किंवा परसबागेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी त्या पैशांचा वापर करीत असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here