साईमत, वरणगाव : प्रतिनिधी
शासनाच्या माध्यमातून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, यासाठी लाभार्थ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना सर्वाधिक त्रास वरणगावातील जेडीसीसी बँकेतील व्यवस्थापकांच्या ताठर भूमिकेमुळे सहन करावा लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
वरणगाव शहरातील बाजार गल्लीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू आहे. या शाखेत वरणगाव व परिसरातील श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, शेतकरी असे किमान दीड हजार खातेदार आहेत. अशा सर्व खातेदारांच्या खात्यावर शासनाच्या माध्यमातून विविध योजनेतंर्गत निधी वर्ग केला जातो. त्यामुळे हा निधी प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांना जेडीसीसी बँकेची शाखा गाठावी लागते. मात्र, जळगाव जिल्हा मध्यवर्ती (जेडीसीसी) बँकेची ही शाखा वरच्या मजल्यावर असल्याने वयोवृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांना बँकेच्या पायऱ्या चढून बँकेत येणे-जाणे कठीण होवून जाते तर काही दिव्यांगांना पायऱ्या चढणे शक्य होत नाही. तसेच अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांची खातरजमा केल्याशिवाय शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम वितरीत करीत नसल्यामुळे दिव्यांग वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील कर्मचारी व व्यवस्थापकांच्या ताठर भूमिकेमुळे बँकेच्या खाली पायऱ्या लगत बसुन त्यांची तासन्तास प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी
शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीची रक्कम प्राप्त करण्यासाठी पायऱ्या चढून वर जाणे शक्य होत नाही. त्यातच अधिकारी व कर्मचारी स्वाक्षरीसाठी लवकर खाली येत नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी दिव्यांग लाभार्थी रहेमान शहा अकबर शहा यांनी केली आहे.