“पन्नास-शंभर कोटींसाठी विकल्या जाणाऱ्यांना जनता पुन्हा निवडून देणार का?” – राज ठाकरेंचा थेट सवाल.
मुंबई:
राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या शिवसेनेच्या (UBT) ६ खासदारांनी केलेल्या बंडखोरीची म्हणजेच ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण राजकीय भूकंपावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. “ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे, ते पाहता भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना आपण काय उत्तर देणार आहोत?” असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईत आयोजित मनसेच्या जाहीर मेळाव्यात ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
”आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरतोय!”
मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सध्या चहूबाजूंनी काय सुरू आहे? सगळी लोक विकली जात आहेत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व, इथला स्वाभिमान आणि परंपरा विसरून जात आहोत. देशाची परंपरा विसरून जात आहोत.”
…त्यांना जनता पुन्हा निवडून देणार का?
राज्यात उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, “एकीकडे राज्यासह महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे, आणि दुसरीकडे आमच्याकडे काय चाललंय? तर खासदार फोडणे, आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे! आमची सत्ता कशी टिकेल यासाठी वाटेल तेवढे पैसे द्यायला सत्ताधारी तयार आहेत. माणसे सर्रास विकली जात आहेत.”
पुढे जनतेला आवाहन करताना ते म्हणाले, “मला वाटतं या गोष्टीचा विचार केवळ राजकीय कार्यकर्त्यांनीच नाही, तर जनतेने आणि सामान्य लोकांनी केला पाहिजे. ज्या माणसाला निवडून देण्यासाठी तुम्ही भर उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात, तो माणूस अवघ्या पन्नास-शंभर कोटींसाठी विकला जातो. अशा लोकांना तुम्ही पुन्हा निवडून देणार का?” असा रोकडा सवाल त्यांनी जनतेला विचारला.
देशासमोर गंभीर प्रश्न; पण नेत्यांना फक्त आमदार-खासदार पळवायचेत!
देशातील इतर ज्वलंत मुद्द्यांवरून लक्ष भरकटवले जात असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी काही महत्त्वाचे आकडे मेळाव्यात सादर केले.
देशात शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
‘नीट’ (NEET) परीक्षेचे पेपर फुटत आहेत. ही परीक्षा जेव्हा आणली, तेव्हाच आपण त्याला सर्वात आधी विरोध केला होता, असे राज ठाकरेंनी आठवून दिले.
गुन्हेगारीत वाढ: आज देशात ज्याप्रमाणे आमदार आणि खासदार पळवले जात आहेत, त्याचप्रमाणे लहान मुले आणि मुली पळवून त्यांचे व्यापार केले जात आहेत.
सत्ताधाऱ्यांवर अंतिम प्रहार:
“देशासमोर आज एवढे गंभीर प्रश्न उभे असताना, आमच्याकडे मात्र आमची सत्ता टिकावी म्हणून करोडो रुपये पाण्यात टाकले जात आहेत. आम्हाला फक्त खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडायचे आहेत, यातच राजकारणी मग्न आहेत,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सध्याच्या सत्तापिपासू राजकारणावर सडकून टीका केली.
