साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी आधीच राजकारण तापलेलं असताना, आता मोर्चा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (SP) वळल्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाच्या खासदारांबाबत एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे.
१२ डिसेंबरपूर्वी ५ खासदार फुटणार?
धर्मराव बाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना थेट तारीख जाहीर करत शरद पवार गटाला इशारा दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तब्बल ५ खासदार येत्या १२ डिसेंबरपर्यंत आमच्याकडे (अजित पवार गटात) येऊ शकतात.” आत्राम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर फक्त खासदारच नाही, तर अनेक आमदारही अजित पवार यांच्यासोबत येण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही ‘ऑपरेशन’ करणार नाही, ते स्वतःच येतील!
पक्षात घेण्यासाठी कोणतीही बळजबरी किंवा ‘ऑपरेशन’ करावे लागणार नाही, असे सांगत आत्राम म्हणाले,
“आम्हाला कोणतीही रणनीती किंवा ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही. ते स्वतः ‘तुतारीवाले’ आमच्याकडे येतील. जर त्यांना भविष्यात पुन्हा निवडून यायचे असेल आणि आपल्या मतदारसंघात कामे करून घ्यायची असतील, तर त्यांच्याकडे सत्ताधाऱ्यांसोबत येण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच ५ खासदार आमच्या संपर्कात आहेत.”
ठाकरे गटातील ६ खासदारांमुळे आधीच भूकंप
हा दावा अशा वेळी आला आहे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) गटाचे ९ पैकी ६ लोकसभा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या खासदारांनी संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती असून, ठाकरे गटाने तातडीने ‘व्हिप’ (पक्षादेश) जारी केला आहे. या ६ खासदारांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडी बॅकफूटवर गेल्याचे चित्र असतानाच, आता शरद पवारांच्या पक्षावरही बंडखोरीचे सावट निर्माण झाले आहे.
सुनेत्रा पवारांची अमित शाह यांच्याशी भेट; चर्चांना उधाण
या संपूर्ण घडामोडींदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे दिल्ली ते मुंबई राजकीय हालचालींना वेग आला असून, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांचाही पक्ष फोडण्याची तयारी सुरू झाली आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. लोकसभेच्या या संभाव्य मोठ्या उलथापालथीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
