साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायनाच्या स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन केले होते. स्पर्धेत जवळपास २० संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेला भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी निलेश ठाकूर, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटिया, मानद सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख पंकज पाटील, सहप्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे व स्पर्धा परीक्षक शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी, विजय पालिवाल, प्रीती गुजराथी आदी उपस्थित होते.
स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराने दोन गटात प्रथम आणि एका गटात कनिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटात महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने क्रमांक मिळविला. स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, पंकज विद्यालय, महिला मंडळ माध्य. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विवेकानंद माध्य. विद्यालय आदींनी सहभाग घेत यश मिळविले.
विजेत्या संघाना स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र प्रदान
सर्व विजेत्या संघाना उप मुख्याधिकारी निलेश ठाकूर, चोपडा रोटरी पदाधिकारी, स्पर्धा परीक्षक व्ही . एस . पाटील, विलास पी. पाटील, चंद्रशेखर साखरे, विपुल छाजेड, प्रदीप पाटील आदींच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्ताविक चेतन टाटीया तर सूत्रसंचालन राधेश्याम पाटील, प्रीती सरवैय्या पाटील यांनी केले.