‘स्वतःला कधीही निराधार समजू नका’;गरजू विद्यार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रेरणादायी संदेश
साईमत /पाळधी, ता. धरणगाव/ प्रतिनिधी :
परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही; जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर परिस्थितीवर मात करून प्रत्येकजण आपले भविष्य घडवू शकतो. गरिबी ही शिक्षणाच्या वाटेतील अडचण असली, तरी ती विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची मर्यादा ठरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही निराधार समजू नये. त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत संपूर्ण जीपीएस परिवार भक्कमपणे पाठीशी उभा आहे, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
पाळधी येथील सुगोकी रिसॉर्ट येथे जीपीएस मित्र परिवाराच्या पुढाकाराने, मनोजभाऊ चौधरी मित्र परिवार आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या सहकार्याने ‘मदतीचा हात’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जळगाव व धरणगाव तालुक्यातील ७९२ निराधार व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, बूट-चप्पल, पाण्याची बाटली तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, “आमची नाळ सर्वसामान्यांशी जोडलेली आहे. गरिबीचे चटके आणि संघर्ष काय असतो, हे मी स्वतः अनुभवले आहे. आई-वडिलांची माया आणि त्यांचे स्थान जगात कोणीही घेऊ शकत नाही. मात्र परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये आणि त्याचे स्वप्न अधुरे राहता कामा नये. आज माझ्यासमोर ७९२ विद्यार्थी नाहीत, तर उद्याची ७९२ स्वप्ने आहेत. याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, अभियंते, सैनिक, उद्योजक आणि कर्तृत्ववान नागरिक घडतील.”
विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा न्यूनगंड मनात बाळगू नये. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी व प्रामाणिक मेहनतीची साथ सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक अनाथ आणि १० हजारांपेक्षा अधिक एकल पालकांची मुले असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील यांनी या मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याची माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत अनाथ प्रमाणपत्र तसेच बालसंगोपन योजनेशी संबंधित प्रक्रिया डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एकल महिलांसाठी महिला उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उद्योग उभारणी, उत्पादन, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निराधार बालकांना आधार, ज्येष्ठांना सन्मान
समाजातील निराधार बालकांना सुरक्षित आधार मिळावा आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सन्मानाने जगण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे, यासाठी अनाथाश्रम व वृद्धाश्रम उभारण्याचा मानस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. “आई-वडिलांची माया आणि त्यांचे स्थान जगात कोणीही घेऊ शकत नाही. मात्र आधाराची गरज असलेल्या बालकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना समाजाने एकटे पडू देता कामा नये,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी प्रास्ताविकातून जीपीएस परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. “जीपीएस परिवाराचे उपक्रम प्रसिद्धीसाठी नसून समाजातील गरजू व उपेक्षित घटक संधींपासून वंचित राहू नयेत, या भावनेतून राबविले जातात. ‘मदतीचा हात’ हा केवळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला आधार देण्याचा संकल्प आहे,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परिस्थितीसमोर न खचता शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्रशासन आणि सामाजिक संस्था पाठीशी उभ्या आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी महिला व बाल विकास विभाग शून्य ते १८ वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला असून, ६०० पेक्षा अधिक मुलांना अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. भविष्यात ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ती ऑनलाइन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा अधिक एकल महिलांसाठी उद्योजकता केंद्र स्थापन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सहा वर्षांच्या ‘माऊली महाराजां’ने जिंकली दाद
कार्यक्रमात चिंचपुरा येथील अवघ्या सहा वर्षांच्या ईयांश पाटील ऊर्फ ‘माऊली महाराज’ या बालकाने आपल्या मधुर आवाजात गवळण सादर केली. बालवयातील आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांसह श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्याच्या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूषण पाटील यांनी केले, तर आभार जीपीएस संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले. यावेळी माजी उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे, रोटरी क्लबचे सचिव धनराज कासट, पुनीत तलरेजा, मुकुंदराव नन्नवरे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, शेतकरी संघाचे सभापती शरद पाटील, जितेंद्र पाटील, डॉ. कमलाकर पाटील, साहेबराव वराडे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा, मंगलअण्णा पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी, जीपीएस परिवाराचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
