विद्यापीठात ‌‘जी-20 युवा संवाद @2047 संमेलनांचे आयोजन

0
39
विद्यापीठात ‌‘जी-20 युवा संवाद @2047 संमेलनांचे आयोजन

साईमत जळगाव प्रतिनिधी

भारतात योजण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने येत्या 22 जुलै 2023 रोजी जी-20 युवा संवाद @2047 या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने देशातील प्रमुख शहरांमध्ये शिक्षण, पर्यटन, महिला विकास, आर्थिक विकास अशा विविध विषयांवर परिसरात, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून कार्यगटही गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्व विद्यापीठांमध्ये 2023 या वर्षात जी-20 युवा संवाद @2047 या संमेलनाचे आयोजन करण्याचे भारत सरकारच्या क्रीडा विभागाने ठरविले आहे.
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या परिषदेचे आयोजन करण्यात येत असून विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधून सुमारे 1500 निवडक विद्यार्थी संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या सहभागासाठी प्रत्येक महाविद्यालयातील 10 विद्यार्थी निवडले जाणार आहेत, यातील सहा विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे असणार आहेत.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या भाषणात देशातील नागरिकांना ‌‘पंचप्रण (संकल्प)‌’ दिलेले आहेत. 2047 पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवापर्यंत भारत विश्वगुरू म्हणून सुस्थापित करण्यासाठी तरुणांनी ‌‘पंचप्रण‌’ समजून घेणे आणि अंगीकारणे आवश्यक आहे, म्हणूनच पंचप्रण ही संकल्पना या संमेलनांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.अमृत काळातील पंचप्रण या प्रमाणे आहेत 1. विकसित भारताचे ध्येय. 2. गुलामगिरी किंवा वसाहतवादी मानसिकते ची चिन्हे काढून टाकणे. 3. आपल्या तेजस्वी वारशाचा अभिमान बाळगणे. 4. एकतेचे सामर्थ्य. 5. नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रुजवणे. या मुळ संकल्पनेच्या अनुषंगाने 25 निवडक विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

युवा संवाद @2047 साठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री ना. अनुराग ठाकूर यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले असून, त्यांना निमंत्रणपत्र पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्राचे युवा कल्याण आणि क्रिडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी उद्घाटन समारंभास उपस्थित रहाण्यास संमती दिली आहे. त्याच प्रमाणे समारोप सत्रासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे बीज भाषण करणार आहेत. संमेलनाच्या प्रभावी आयोजनासाठी कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात आली असून व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे या समितीचे कार्याध्यक्ष तर व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील समन्वयक आहेत. या समितीमध्ये व्य.प.सदस्य नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य विष्णु भंगाळे, अमोल मराठे, नितीन ठाकूर, नेहा जोशी, स्वप्नाली काळे यांचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडे मुख्य संयोजना ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या विभागाचे संचालक डॉ सचिन ज नांद्रे, डॉ मनिष करंजे, समन्वयक रासेयो जळगाव जिल्हा, डॉ प्रमोद पाटील समन्वयक रासेयो धुळे जिल्हा, डॉ विजय पाटील समन्वयक रासेयो नंदुरबार जिल्हा यांच्यासह विविध 18 समिती नियुक्त करुन 170 पेक्षा अधिक शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक कार्य करीत आहेत. संमेलनाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी आपआपल्या महाविद्यालयांच्या रासेयो संचालक/प्रमुख यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन समन्वयक अमोल पाटील आणि डॉ सचिन नांद्रे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here