विशेष प्रतिनिधी | जळगाव :
रब्बी हंगामात घरी आलेली ज्वारी हमीभावात खरेदी करण्याची शासनाची घोषणा कुचकामी ठरली असून फक्त 30 जूनपर्यंतच शासन ज्वारी खरेदी करणार आहे.जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली असताना जिल्ह्यातील अठरा खरेदी केंद्रापैकी आज (15 जून) अखेर फक्त दहा केंद्र सुरु झाल्याने उर्वरित पंधरा दिवसात खरेदी होऊच शकत नाही,अशी भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, जळगाव जिल्ह्याला फक्त 30 हजार क्विंटल ज्वारी खरेदीची मर्यादा असल्याने निम्मे अधिक शेतकऱ्यांना आपली ज्वारी बाजारभावाने कमी दरात विक्री करावी लागणार आहे.
हमीभावाने शेतमाल खरेदीच्या नावावर शेतकऱ्यांची होते थट्टा :
एकीकडे शासन मोठा गाजावाजा करून हमीभावात वाढ केल्याचे सत्तेतील लोकप्रतिनिधी सांगत असतात मात्र,दुसरीकडे हमीभावात शेतकऱ्यांचा मालच खरेदी केला जात नाही.गोदाम उपलब्ध नसणे,गोदाम असले तर बारदान नसणे अशा अडचणी पुढे करून शेतमाल खरेदी जाहीर करूनही प्रत्यक्षात होत नसल्याने शेतकऱ्यांची थट्टा सुरु असल्याचा सूर जिल्ह्यातून उमटत आहे.यापूर्वी सुद्धा मका, सोयाबीन, तूर व हरभरा खरेदीसाठी जाहीर केलेल्या हमीभावा पेक्षा बाजारात जास्त भाव मिळाल्याने जिल्ह्यात खरीपाच्या उत्पादनाची हमीभाव केंद्रे ओस पडून होती.कापूस खरेदी सुद्धा विलंबाने जाहीर झाली होती त्यापूर्वीच अर्ध्या अधिक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी भावात आपला कापूस विकला होता.दरम्यान,अद्याप सुद्धा शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असला तरी खरेदी बंद झाल्याने कापूस उत्पादकांची सुद्धा यावर्षी कुचंबना पाहायला मिळाली.
अठरा केंद्राना ज्वारी नोंदणी पण खरेदी मात्र सुरूच नाही :
शासनाने ज्वारीसाठी 3 हजार 180 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी 2000 ते 2300 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. 800 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा,एरंडोल,जळगाव, भुसावळ,रावेर,मुक्ताईनगर,जामनेर,पाचोरा,पारोळा, भडगाव, चाळीसगाव येथील शेतकरी सहकारी संघांना, तर बोदवड सहकारी पर्चेस अँड सेल्स युनियन, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्था, फ्रुटसेल सोसायटी पाळधी,शेंदुर्णी सहकारी जिनिंग व प्रेसिंग, कोरपावली वि.का. सोसायटी, यावल या केंद्रावर ज्वारी खरेदीची नोंद होणार होती. तथापि रावेर – यावल तालुक्यात ज्वारीचे पिकपेरे नसल्याचे कारण देत तिकडचे केंद्र सुरु करण्यात आले नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन.मगरे यांनी सांगितले.आज अखेर फक्त 410 शेतकऱ्यांची
7 हजार 500 क्विंटल ज्वारी खरेदी झाल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
❝ महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची चेष्ठा करणारे व संवेदना नसलेले सरकार आहे.हमीभावाने शेतमाल खरेदीची घोषणा फक्त करणे,प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरु न करता व्यापाऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे या सरकारचे धोरण राहिले आहे.शेतकऱ्यांना वारंवार अडचणीत न आणता जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र ताबडतोब सुरु व्हावेत, ज्वारी खरेदीला घालून दिलेली मर्यादा व ज्वारी खरेदीची मुदत वाढून मिळाली पाहिजे.❞
>> लक्ष्मण पाटील (लकी टेलर)
माजी सभापती
कृषि उत्पन्न बाजार समिती,जळगाव
❝ जिल्ह्यातील सर्व अठरा ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याबाबत मी व्यक्तिश: जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांच्याशी बोललो आहे.केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे,पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून ज्वारी खरेदीला ३० जूनपर्यंत मुदत असली,तरी शासनाकडून मुदतवाढ मिळवून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ज्वारी खरेदीसाठी आग्रही राहू.❞
>> अमोल हरिभाऊ जावळे
जिल्हाध्यक्ष,भाजपा
रावेर लोकसभा क्षेत्र.