सहकार विभागातर्फे 436 कोटींचे कांदा अनुदान

0
13

साईमत, नाशिक : प्रतिनिधी
सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख 72 हजार 152 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 435 कोटी 61 लाख 23 हजार 578 रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम बुधवारी उशिरापर्यंत सुरू होते.
हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचारी करत होते, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दिली. राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने 27 मार्च 2023 ला घेतला.

क्विंटलला 350 रुपयेप्रमाणे 200 क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले. त्याअनुषंगाने 3 ते 30 एप्रिलला शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here