साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरात अवैध शस्त्र विक्रीला आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा इसम कट्टा विक्रीच्या उद्देशानेच परिसरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले.
”शहरातील गुन्हेगारी आणि अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या गुन्ह्याची शक्यता टळली असून, या शस्त्रांचा मूळ स्रोत शोधणे सुरू आहे.”
शस्त्रांच्या मागचे ‘नेटवर्क’ शोधणार
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या शस्त्राचा वापर यापूर्वी अन्य कोणत्या गुन्ह्यात झाला आहे का, तसेच जळगावात हे कट्टे पुरविण्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा सखोल तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
