महानगरपालिकेत मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा विशेष आढावा
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव शहरात ३० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम राबवला जात आहे. या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवण्यासाठी मंगळवारी (२१ जुलै) जळगाव शहर महानगरपालिका सभागृहात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (१३-जळगाव शहर) यांच्यातर्फे आयोजित या बैठकीस महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना मोरे, प्रांताधिकारी विनय गोसावी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.
वॉर्डनिहाय ‘एसआयआर’ मॅपिंगचा आढावा
बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे व महापौर दीपमाला काळे यांनी वॉर्डनिहाय विशेष सखोल पुनरीक्षण (मॅपिंग) कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. कोणत्या वॉर्डात उत्तम काम झाले आणि कुठे अधिक गती देण्याची गरज आहे, याची सविस्तर माहिती नगरसेवकांना देण्यात आली. नगरसेवकांनी मांडलेल्या समस्यांचे जिल्हाधिकारी व महापौरांनी तात्काळ निरसन केले.
“लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात मतदार नोंदणीसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या संपूर्ण प्रक्रियेत काही अडचणी असल्यास थेट महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव
शहरात मतदार नोंदणीची काय आहे सद्यःस्थिती?
बाबीआकडेवारी / प्रमाण
एकूण मतदार३,८०,५२५
मॅपिंगचे एकूण लक्ष्य२,२५,१२६
आतापर्यंत झालेले मॅपिंग१,४८,३८३ (५९.१६%)
ऑनलाईन डिजिटाईज्ड अर्ज३८.९९%
१००% काम करणाऱ्या ‘बीएलओ’चा सन्मान
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे शंभर टक्के काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंना (BLO) या बैठकीत महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले:
मनोज बावस्कर (वॉर्ड ८ व १०)
महेंद्र नेमाडे (वॉर्ड १२)
सुवर्णसिंग राजपूत (वॉर्ड १६)
शामकांत पवार (वॉर्ड ८ व १०)
राजकीय पक्षांच्या ‘बीएलए’ (BLA) नेमणुकीवरून निर्देश
शहरात एकूण ३५८ मतदान केंद्रे आहेत.
आतापर्यंत केवळ भाजप आणि शिवसेना यांनीच सर्व ३५८ केंद्रांसाठी बीएलएची पूर्ण नेमणूक केली आहे.
काँग्रेस पक्षाकडून ७३ बीएलए नियुक्त झाले असून, इतर पक्षांनी अद्याप नेमणूक केलेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: उर्वरित सर्व राजकीय पक्षांनी तात्काळ बीएलएची नियुक्ती करावी.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) ८ ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन गणना पत्रकांचे वाटप व संकलन करणार आहेत. ही माहिती प्रणालीवर अपलोड केली जाणार असून, मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी नागरिकांनी बीएलओंना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
