साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा जळगाव जिल्हा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोपडा तालुक्यातील वटार आणि भुसावळ येथील जनसेवा क्लिनिकवर पोलिसांनी छापे टाकून ही मोठी कारवाई केली आहे.
वटार येथे अॅलोपॅथिक उपचारांचा धंदा
अडावद पोलिसांना वटार येथे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, अरुपकुमार अजयकुमार आढळ (वय ४१) हा व्यक्ती कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर अॅलोपॅथिक औषधे आणि इंजेक्शन्सद्वारे उपचार करताना आढळला. पोलिसांकडून त्याच्याकडील स्टेथॉस्कोप, औषधे आणि इंजेक्शन्स जप्त करण्यात आले आहेत.
भुसावळात ‘जनसेवा क्लिनिक’वर धाड
दुसऱ्या घटनेत, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील ‘जनसेवा क्लिनिक’वर छापा टाकला. तेथे उमेश मधुकर सपकाळे हा व्यक्ती कोणतीही पदवी नसताना क्लिनिक चालवत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले
वटाण आणि भुसावळ येथील या धाडसत्रामुळे जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वैद्यकीय सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भोंगळ डॉक्टरांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
