धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत! ‘मराठा भवन’च्या २८ गुंठे जागेचा नेमका वाद काय?
बीड:
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परळी येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या ‘मराठा भवन’च्या भूमीपूजनाची जागा आता कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंडे यांच्यासह परळी नगर परिषदेच्या तात्कालीन पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
गत १४ मे रोजी आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीमध्ये २८ गुंठे जागेवर ‘मराठा भवन’चे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, ‘श्री दत्त देवस्थान थोरले देवघर’ या संस्थेचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी या जागेवर आपला हक्क सांगत खळबळजनक दावा केला आहे.
गोस्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की:
सदर २८ गुंठे जमीन ही वर्ग-२ ची ‘इनामी जमीन’ असून ती पूर्णपणे देवस्थानच्या मालकीची आहे.
केवळ राजकीय फायद्यासाठी संगनमत करून, बनावट कागदपत्रांच्या आधारे देवस्थानच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा ‘मराठा भवन’साठी देण्यात आला आहे.
तीन बड्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार
श्री दत्त देवस्थान संस्थानने जमिनीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांसह जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत संस्थेने खालील तिघांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे:
१. धनंजय मुंडे (स्थानिक आमदार व माजी मंत्री)
२. पोपट निगळ (मुख्यधिकारी, परळी नगर परिषद)
३. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी (नगराध्यक्ष, परळी)
हायकोर्टात जाण्याचा आणि आंदोलनाचा इशारा
देवस्थानच्या वतीने या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. जर जिल्हा प्रशासनाने या बनावटगिरी प्रकरणी धनंजय मुंडे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले नाहीत, तर थेट मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संस्थानने दिला आहे.
’मराठा भवन’च्या भूमीपूजनावरून श्रेय घेण्याच्या तयारीत असलेल्या धनंजय मुंडेंची या नव्या वादामुळे राजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, परळीच्या राजकीय वर्तुळात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
