साईमत न्यूज नेटवर्क –
कळवण : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आठ दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा भूकंपाचे हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचीही प्राथमिक माहिती नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजून ०६ मिनिटांच्या सुमारास आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरातील नागरिकांना काही सेकंद भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. साधारण तीन ते पाच सेकंद जाणवलेल्या या हादऱ्यांमुळे घरातील वस्तू तसेच काही ठिकाणी दरवाजे-खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक धक्का जाणवल्याने घाबरलेल्या काही नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांच्या भीतीत आणखी भर पडली. या घटनेचे केंद्र निर्घुडपाडा परिसर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र भूकंपाची नेमकी तीव्रता आणि केंद्राबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात ८ ऑगस्ट रोजीही भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून परिसरात पुन्हा भूकंपीय हालचाली जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा धक्के जाणवल्याने कळवण तालुक्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, भूकंपाच्या घटनेनंतर प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून संभाव्य नुकसानीची पाहणी केली जात आहे. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि भूकंपविषयक यंत्रणांच्या अधिकृत अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
