साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
नगरदेवळा येथील श्रीमंत सरदार जहागीरदार पवार परिवारातील ज्येष्ठ सुपुत्र तथा पुणे येथील युवा उद्योजक अर्जुन दिग्विजयराव पवार यास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते “उद्योग भूषण” म्हणून नुकतेच गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये आयोजित विशेष समारंभात सन्मानचिन्हासह प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. अर्जुन पवार हे नगरदेवळा येथील श्रीमंत सरदार जहागीरदार तथा जळगाव जि.प. चे माजी उपाध्यक्ष कै.बाळासाहेब के. एस. पवार यांचे नातू आणि माजी जि. प सदस्या वंदना दिग्विजय पवार यांचे सुपुत्र आहे.
उद्योग क्षेत्रात अर्जुन पवार यांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असून निकोल ई.व्ही. कंपनीचे संचालक आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग उपकरणांची निर्मिती, उभारणी व व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत कोल्हापूरच्या समारंभात युवा उद्योजक गटात उद्योग भूषण उपाधीने त्यांना गौरविण्यात आले. त्यांचा गौरव युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खान्देशातील ऐतिहासिक नगरदेवळा गावातील पवार जहागीरदार परिवाराचा व खान्देशचा गौरव होत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.