साईमत न्यूज नेटवर्क –
हैदराबाद – महबूबनगर जिल्ह्यातील जडचेरला शहरात शनिवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वाय. वैष्णवी असे मृत तरुणीचे नाव असून ती जडचेरला येथील एका खासगी शाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. संशयित आरोपी गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता आणि प्रेमाच्या नावाखाली तिला सातत्याने त्रास देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शनिवारी वैष्णवी नेहमीप्रमाणे बसमधून उतरून पायी घरी जात असताना आरोपीने तिच्यावर अचानक हल्ला केला. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर जडचेरला परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
