७ दिवसांत शहराबाहेर हलवण्याचे आदेश, अन्यथा कठोर पावले
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील वाढत्या भटक्या वराहांच्या (डुक्कर) समस्येमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छता आणि आरोग्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने डुक्कर पालन करणाऱ्यांवर कारवाई करत मनपाने संबंधितांना नोटीस बजावत ७ दिवसांत सर्व डुक्कर शहर हद्दीबाहेर हलवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डुक्करांचे भटकंती स्वरूपात संचार होत असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची तक्रार सातत्याने प्रशासनाकडे येत होती. या पार्श्वभूमीवर मनपाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३७६ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
जारी करण्यात आलेल्या नोटिशीनुसार, शहरात नियमांचे उल्लंघन करून डुक्कर पाळले जात असल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित मालकांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत सर्व डुक्कर शहर हद्दीबाहेर हलविणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत पालन न झाल्यास महानगरपालिका स्वतः पुढाकार घेऊन खाजगी एजन्सीच्या मदतीने डुक्कर पकडून त्यांची विल्हेवाट लावणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याचबरोबर, शहरात कुठेही भटके डुक्कर आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीची जबाबदारी मनपावर राहणार नसून संबंधित डुक्करपालकांनाच त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
ही कारवाई मनपा आयुक्तांच्या मान्यतेने राबविण्यात येत असून, उपायुक्त (सामान्य प्रशासन) निर्मला गायकवाड-पेखळे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
शहरातील स्वच्छता राखणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या उद्देशाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळापासून त्रासदायक ठरत असलेल्या भटक्या डुक्करांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
