गृहकर्जाचे हप्ते भरूनही रक्कम बुडीत खात्यात; अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीच्या तिघांवर गुन्हे
जळगाव (प्रतिनिधी) –
शहरातील अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीच्या गृहकर्ज वसुलीत घोटाळा झाला आहे. थकलेले हप्ते भरूनही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रक्कम कर्जधारकाच्या खात्यात न भरता अन्यत्र वळवल्याने शेतमजुर कर्जदाराचे घर कंपनीने सील केले शहर पोलीस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथील शेतमजूर विजय चिंचोले (वय २६) यांनी अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते. मात्र, त्यांचे ७ हप्ते थकीत राहीले. या हप्त्यांची रक्कम ५२ हजार रुपये त्यांनी ती वसुली अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्याकडे भरली.
कोळी यांनी वरिष्ठ अधिकारी विजय आचलकर आणि आदिती तळवलकर यांच्या सांगण्यावरून ती रक्कम चिंचोले यांच्या खात्यात न भरता एनपीए (थकीत कर्ज) खात्यात वर्ग केली व ते खाते बंद केले.
चिंचोले यांचे हप्ते भरले न गेल्याचे दाखवून फायनान्स कंपनीने घरावर जप्तीची कारवाई केली. फायनान्स कंपनीमुळे फसवणूक झाल्याने विजय चिंचोले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली चंद्रकांत कोळी, विजय आचलकर आणि आदिती तळवलकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे कॉ गोरख पाटील करीत आहेत.