साईमत / चाळीसगाव
सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले नकली पिस्तूल (एअर गन) जप्त करण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गोल्हार या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया खात्यावर पिस्तूल हातात घेऊन फोटो व व्हिडिओ पोस्ट केले होते. या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची गंभीर दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. मंगळवारी रात्री सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीकडील पिस्तूल हे खरे नसून एअर गन असल्याचे स्पष्ट झाले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२ व ११७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
