वराडजवळ क्रूझरचे चाक निखळून गाडी पलटी; सहा जण गंभीर जखमी, परिसरात शोककळा
धरणगाव : तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे जात असलेल्या क्रूझर गाडीचे चाक चालू अवस्थेत निखळल्याने गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरातमधील वापी येथे झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याकडे परतत होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला.
बुधवारी सकाळी क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर पलटी झाली. या भीषण अपघातात नववधू पूजा वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लग्नाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. अपघातात प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय अंश नितेश काठोडे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
