मनसे केवळ आंदोलक नाही तर रक्षकही; थेट मैदानात उतरून मनसे सैनिकांचे श्रमदान
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगावातील आकाशवाणी चौकात मनसेतर्फे बोगनवेलींचे वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे नियमित संवर्धन, संगोपन आणि देखभालीची जबाबदारी मनसेच्या जळगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून आज या सर्कल परिसरातील अनावश्यक गवतावर तणनाशकाची फवारणी करून मनसैनिकांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.
बोगनवेलींच्या झाडांची योग्य वाढ व्हावी आणि सर्कलचे सौंदर्य अधिक खुलावे, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून झाडांना नियमित पाणी देणे, खत टाकणे आणि झाडांची निगा राखण्याचे काम सुरू आहे. वाढलेल्या अनावश्यक गवतामुळे झाडांच्या वाढीला अडथळा निर्माण होत असल्याने, मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः फवारणी पंप आणि तणनाशक औषध उपलब्ध करून देत थेट मैदानात उतरून संपूर्ण परिसरात फवारणी केली.
’आंदोलनासोबतच पर्यावरण संवर्धन ही आमची जबाबदारी’
”महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही केवळ आंदोलने करणारी संघटना नसून समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी प्रत्यक्ष कृती करणारी संघटना आहे,” असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि सुशोभित व्हावे, हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असून भविष्यातही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातील, अशी माहिती मनसेतर्फे देण्यात आली.
आकाशवाणी सर्कल येथे झालेल्या या तणनाशक फवारणी आणि स्वच्छता मोहिमेप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम आणि ललित शर्मा यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
