साईमत न्यूज नेटवर्क –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, खाद्यतेलाची बचत करणे, सोने खरेदीवर नियंत्रण ठेवणे, परदेश दौरे मर्यादित करणे तसेच मेट्रो व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. या आवाहनावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
पुण्यातील नागरिकांनी या सूचनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “लग्नकार्यांमध्ये सोने खरेदी टाळून कसे चालेल?”, तसेच “सामान्य नागरिकांनी प्रवास कमी करायचा, पण नेतेमंडळी मात्र सतत दौरे करतात,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त झाल्या. वाढत्या सोन्याच्या दरामुळे आधीच आर्थिक ताण जाणवत असताना “सोनं खरेदी करण्यासाठी लोकांकडे पैसा कुठे आहे?” असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, जळगावातील सुवर्णनगरीतील सराफा असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी या आवाहनाचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, मोठ्या गुंतवणूकदारांकडून होणारी साठेबाजी रोखण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो. रुपयाच्या मूल्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून देशहितासाठी हा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे PNG Jewellers चे अभय गाडगीळ यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोने हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. सण-समारंभ व लग्नकार्यांमध्ये सोन्याला विशेष महत्त्व असल्याने या आवाहनाचा तत्काळ व्यवसायावर मोठा परिणाम होईल असे वाटत नाही. मात्र दीर्घकाळ अशा धोरणांचा परिणाम कारागीर, सोनार व संबंधित कामगारांवर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
जालन्यातील नागरिकांनी इंधन बचतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “विनाकारण वाहनांचा वापर टाळला पाहिजे, इंधन बचत ही काळाची गरज आहे,” असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. तर काहींनी वास्तव मांडताना “गरीब माणूस आधीच गरजेपुरतेच सोने घेतो, लग्नासाठीही फक्त मंगळसूत्रापुरतेच सोने खरेदी केले जाते,” असे सांगितले.
एकूणच पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे आर्थिक शिस्त, महागाई आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात त्याचे परिणाम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
