खून झाल्याची खोटी माहिती दिल्यावरुन एकाला अटक
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
येथील जारगाव चौफुली येथे दोन जणांचा खून झाल्याची ११२ डायल क्रमांकावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यामुळे नागरिकांसह पोलिसांची दिशाभूल करणे त्याला महागात पडले आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनला रविवारी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर १५० ते २०० लोक विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. त्यापैकी दोन लोकांचा खून झालेला आहे. त्यात चॉपरसारख्या हत्याराचा वापर केलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा, असा फोन आलेला होता. अशी माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचा स्टाफ रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावून मिळालेल्या माहितीप्रमाणे सखोल चौकशी केली. मात्र, फोन आल्याप्रमाणे त्याठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. फोन केलेल्या इसमाच्या मोबाईल नंबरवरुन त्याचा शोध घेतल्यावर शैलेश रवींद्र पाटील (रा.तामसवाडी, ता.पारोळा, हल्ली मु.रा. जारगाव चौफुली, पाचोरा) हा मिळून आला.
मुद्दामहून पोलीस स्टेशनला केला फोन
घटनेबाबत त्यास विचारपूस केल्यावर त्याने कळविले की, मी मुद्दामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला होता. तशी काही एक घटना घडलेली नाही. शैलेश रवींद्र पाटील याने नागरिकांसह पोलिसांना त्रास व्हावा, या हेतुने मुद्दामहून पोलिसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत आहे.