साईमत न्यूज नेटवर्क –
हिंगोली : जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर जमिनीतून गूढ आवाज येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही वेळातच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी जमा झाले. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असले तरी त्यानंतर निर्माण झालेल्या घबराटीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले.
दरम्यान, या घटनेबाबत ग्रामस्थांकडून भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा करण्यात येत असला, तरी वृत्त लिहिपर्यंत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नव्हता. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भूकंपाच्या धक्क्यांबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
