साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
जिल्ह्याचे राजकीय पितामह म्हणून ओळख असलेले माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्याशी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचे पूर्वीपासून फार जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध होते. सुरेश दादांचे दोन दिवसापूर्वी जळगाव मध्ये आगमन झाल्यानंतर मला फार आनंद झाला. सुरेश दादा हे व्यापक जाणीव असलेले सक्षम अष्ठपैलू नेता आहेत. त्यांच्याकडे विचार समजून घेण्याची फार मोठी क्षमता आहे. आर.ओ. तात्यानंतर मी प्रथमच दादांना भेटत आहे. दादांना सदिच्छा देऊन मोकळी चर्चा झाली. ते फार सकारात्मक आहेत आणि सकारात्मक भूमिकेतूनच सकारात्मक बदल घडू शकतो याची जाणीव झाली. सामाजिक व राजकीय भूमिका निभवतांना अधिकाधिक उत्तरदायित्वासाठी प्रेरणा मिळाली. सुरेश दादांना भेटून नवीन ऊर्जा मिळाली असे निर्मल सीडच्या संचालिका तथा पाचोरा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, रमेश बाफना, उद्धव मराठे इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,आर. ओ.तात्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात सक्रिय झाली. सामाजिक, राजकीय व व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना तात्यांनी दिलेली शिकवण आणि सुरेश दादा सारख्या मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन व आशीर्वाद सोबत असल्यामुळे काम करताना प्रचंड उत्साह वाढतो. राजकीय व कृषी क्षेत्रात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तात्यासाहेबांवर समस्त जिल्ह्याचं, राजकीय पुढार्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि आता सुरेश दादांच्या भेटीमुळे मला नवी ऊर्जा मिळाली असे बोलताना वैशालीताई सूर्यवंशी म्हणाल्या.