शनिवारी सकाळीच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये महापौरांचा ‘सप्राइज व्हिजिट’ दौरा
साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात ढिसाळपणा करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना महापौर दीपमाला काळे यांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही महापौरांनी सकाळीच शहरात विविध ठिकाणी ‘ऑन द स्पॉट’ पाहणी दौरा केला.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची त्यांनी जागेवरच कडक शब्दांत कानउघडणी केली. तसेच, संभाजीनगर आणि रामानंदनगर भागातील नाल्यांच्या गंभीर परिस्थितीवर सोमवारी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना (टाऊन प्लॅनिंग) विभागाला दिले आहेत.
धक्कादायक! थेट नाल्यांवरच बांधली घरे; मुख्य स्वच्छता निरीक्षकांचा खुलासा
दौऱ्याच्या सुरुवातीला महापौर दीपमाला काळे यांनी संभाजीनगर चौक, विवेक कॉलनी आणि रविराज कॉलनी परिसराची पाहणी केली. या भागात वीज वाहिन्यांचे (वायरिंग) धोकादायक जाळे पसरले असून नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी नाल्यांवर थेट घरे बांधून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास येथे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांनी पाहणी दरम्यान दिली. महापौरांनी स्वतः नाल्यांच्या कडेला जाऊन नागरिकांशी संवाद साधला.
यानंतर महापौरांचा ताफा रामानंदनगर परिसरातील विवेकानंद नगर आणि शिवनेरी सांस्कृतिक मंडळ परिसरात पोहोचला. “पावसाचे घाण पाणी थेट आमच्या घरात, अंगणात आणि कंपाऊंडमध्ये शिरते. दरवर्षी आम्हाला नरकयातना सहन कराव्या लागतात,” अशी संतप्त तक्रार स्थानिक नागरिक प्रशांत पाटील आणि इतर रहिवाशांनी महापौरांकडे केली. यावर महापौरांनी तातडीने ॲक्शन मोडमध्ये येत, नगररचना विभागाला सोमवारपर्यंत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे कडक निर्देश दिले.
महापौरांची ही तत्परता पाहून नागरिक भारावून गेले. “केवळ एसी केबिनमध्ये बसून आश्वासन देणारे नेते आम्ही खूप पाहिले, पण प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करणाऱ्या तुम्ही पहिल्याच महापौर आहात,” अशा शब्दांत नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर रामानंदनगर घाटाच्या शेवटी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करून महापौरांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पिंप्राळ्यातील त्या जीवघेण्या नाल्याचा प्रश्न सुटणार?
प्रभाग ११ मधील खंडेराव नगर रेल्वे पुलाजवळील नाल्यात पाणी साचून दरवर्षी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तर प्रभाग १० मधील पिंप्राळा येथील वटुकेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यात भूतकाळात नागरिक आणि गुरेढोरे वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या दोन्ही संवेदनशील ठिकाणांची महापौरांनी बारकाईने पाहणी केली.
पिंप्राळ्यातील नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सोमवारी महापालिकेत अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अन् आरोग्य विभाग ‘हायअलर्ट’वर
हवामान खात्याचा अंदाज आणि शहरात कधीही कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन महापौर दीपमाला काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाला २४ तास ‘हायअलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी सुट्टीच्या दिवशीही महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून घेतलेल्या या धावत्या शोधमोहिमेमुळे सुस्तावलेल्या प्रशासनाचे धाबे दणाणले असून जळगावकरांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाहणी दौऱ्यात नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, सागर पाटील, महापालिका अधिकारी अतुल पाटील यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
