साईमत न्यूज नेटवर्क –
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असून जळगावच्या सुवर्ण बाजारावरही याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. आज पुन्हा दोन्ही धातूंच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
जळगावच्या सराफा बाजारात आज १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल १२०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर १ किलो चांदीच्या दरातही २००० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी देखील सोन्याच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली होती. मात्र त्याच दिवशी चांदीच्या दरात तब्बल ४००० रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली होती.
आज पुन्हा परिस्थिती बदलली असून सोनं १ लाख ५७ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटी वगळून) इतके झाले आहे. तर चांदी २ लाख ७० हजार रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचली आहे.
मंगळवारी सोनं-चांदीच्या तुलनेत दर कमी झाले होते. त्यावेळी सोन्याचा दर १ लाख ५६ हजार ३०० रुपयांवर खाली आला होता, तर चांदीही २ लाख ६८ हजार रुपयांपर्यंत घसरली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा दर वाढल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षभरापासून सोनं-चांदीच्या दरात सतत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी दर वाढून उच्चांक गाठतात, तर कधी अचानक घसरण होऊन ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतो. मात्र सततच्या या बदलांमुळे खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सध्या अधिक मास सुरू असल्याने अनेक नागरिक चांदी खरेदीकडे वळताना दिसत आहेत. परंतु दरातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सावध भूमिका घेत असल्याचे बाजारातून समोर येत आहे.
